वास्तुशांती का करावी? याचे विधान काय आहे ते पाहू
“लग्न पहावं करून, घर पहावं बांधून,” ही एक प्रचलित म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की लग्न आणि घर यांचा आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तु हा शब्द वास धातूपासून निर्माण झाला आहे. वास म्हणजे राहणे, आणि राहण्यायोग्य वास्तु कशी असावी हे आपण वास्तुशास्त्रात पाहू.
वास्तु शब्दाचा अर्थ
मनुष्याला जीवनात तीन प्रमुख बाबींची आवश्यकता असते: शक्तीसाठी अन्न, निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र, आणि निवासासाठी सुरक्षित घर. घर ही महत्त्वाची गरज आहे, आणि ती लाभदायी ठरावी, याचाही विचार आपण केला पाहिजे. अनेक लोक कष्ट करून स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहतात, परंतु त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी दैवाची अनुकूलता आवश्यक असते. ज्योतिष अभ्यासानुसार, आपल्या कुंडलीतील चतुर्थ स्थानावरून वास्तु लाभ पाहतात. दैव आणि ग्रह अनुकूल झाल्यानंतरच आपले स्वतःच्या मालकीचे घर प्रत्यक्षात साकार होते.
वास्तुशांती विधान
वास्तुशांती करण्यासाठी, वास्तुशांतीच्या विधीचे अनुसरण करावे:
वास्तुशांती संकल्प
आपल्या वास्तुमध्ये शांती, सुख, समृद्धी यावी, या उद्देशाने वास्तुशांती करावी. प्रथम गणपतीपूजन, भूमीपूजन, दीपनाथपूजन, सूर्यनारायणपूजन आणि पुण्याहवाचन करावे. कलशामध्ये सात नद्यांचे पाणी, गंध, हळद, दुर्वा, नाणे, पंचरत्न, सुपारी, दशोषधी, सप्तमृतिका, पंचपल्लव आणि नारळ ठेवून पूजा करावी. कलशाचे पाणी ताम्हणामध्ये काढून, त्या पाण्याने सर्वांना अभिषेक करावा.
मातृकापूजन
मातृका म्हणजेच देवींचे पूजन करावे. गणपती, गौरी, पद्मा, शची, मेधा, सावित्री, विजया, जया, देवसेना, स्वधा, स्वाहा, मातरा, लोकमातरा, ध्रुती, पुष्टी, तुष्टी, कुलदेवता, आणि सात घृत मातृकांचे पूजन करावे.
आयुष्यमंत्रजप
यजमानांना आरोग्य आणि दिर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी मंत्र म्हणून आशिर्वाद द्यावे.
नांदीश्राद्ध
पूर्वजांचे स्मरण करून, नांदीश्राद्ध करावे. शुभ वातावरणात, पवित्रक धारण करून, हात-पाय धुवून नविन पवित्रक धारण करावे.
शांतिकर्म
शांतिकर्मासाठी गुरुजींना अधिकार देऊन, जागेची शुध्दी करावी. पंचगव्यकरण करून, भूमीपूजन, पंचभुसंस्कार, अग्निस्थापना, आणि हवन करावे. यजमानासाठी वैदिक मंत्र आणि सूक्ते म्हणावीत. आहुती देऊन प्रायश्चित्तहोम, क्षेत्रपालबली, शांतिसूक्त, आणि पूर्णाहूति करावी.
वास्तुनिक्षेप
वास्तुच्या अग्नेय कोपऱ्यात कलश ठेवून, सप्तधान्य, पंचरत्न, सुवर्ण नाग, आणि हळद-कुंकूचे प्रतीक उमटवावे. श्रीवास्तु प्रतिमा आणि नवग्रह मंडल स्थापन करून पूजा करावी.
गृहप्रवेश
गृहप्रवेशासाठी, यजमानांनी देव हातात घेऊन, यजमान पत्नींनी कलश डोक्यावर घेऊन प्रवेश करावा. मुख्य द्वार देवतेचे पूजन करून स्वस्तिक, शुभ-लाभ काढावे.
समारोप
वास्तुशांतीच्या समाप्तीनंतर, ब्राह्मणभोजन, विडादक्षिणा, गुरुजींना नमस्कार करून, त्यांच्या आशिर्वादाने कार्य संपन्न करावे. अंततः, ३ वेळा विष्णूस्मरण करून सर्व कर्म भगवंताला अर्पण करावे.
विधी शाखाभेदाप्रमाणे थोड्याफार बदल होऊ शकतो, परंतु मुख्य उद्देश वास्तुशांती करणे आणि वास्तुच्या शुभत्वाचे संरक्षण करणे आहे.